फिर एक बार मोदी सरकार..! एनडीएला स्पष्ट बहुमत

Foto

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज सुरुवात झाली. मतमोजणीत दुपारपर्यंत देशभरातील 543 जागांपैकी 330 जागांच्यावर भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालली होती. तीच जादू 2019 मध्ये कायम असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काँग्रेस युपीए आघाडीची वाटचाल शतकाच्या दिशेने तर अन्य पक्षाचे 115 पर्यंत उमेदवार आघाडीवर आहेत. सायंकाळपर्यंत निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीतील आघाडी पाहता देशातील जनतेने फिर एक बार मोदी सरकारला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट होत आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतत्वाखालील एनडीए स्पष्ट बहुमत मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येणार, असे दिसत आहे. भाजपसह एनडीए यावेळी तीनशेहून अधिक जागा जिंकण्याची चिन्हे आहेत. आज संध्याकाळी भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्‍लीत बैठक होाणर असून, पंतप्रधान मोदी पक्ष कार्यालयात संध्याकाळी 5.30 वाजता कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये देशातील 543 मतदारसंघांत निवडणूक झाली होती. त्यापैकी 542 जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तामिळनाडूतील वेल्‍लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. 

  उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने मोठे आव्हान उभे केले असतानाही भाजपने पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून, भाजपप्रणित एनडीए 55 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी 22 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व तृणमृल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आव्हान उभे केलेल्या पश्‍चिम बंगालमध्येही भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये भाजप सर्व 26 जागांवर तर मध्य प्रदेशात 28 जागांवर आघाडीवर आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून 1 लाखांहून अधिक मतांनी तर भाजपाध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून 1 लाख 25 हजार मतांनीआघाडीवर आहेत. काँग्रेसचा गड समजल्या जाणार्‍या अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर असून, येथे भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 7 हजार 600 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, वायनाडमधून राहुल गांधी 58 हजार मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीतून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडी घेतली आहे. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर 50 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. सुलतानपूरमधून भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री मनेका गांधी व गाझीपूरमधून भाजपचे दिग्गज नेते मनोज सिन्हा पिछाडीवर आहेत. गाझियाबादमधून व्ही. के. सिंग आघाडीवर आहेत. बिहारमधील पाटणा साहिबमधून भाजपचे रविशंकर प्रसाद आघाडीवर तर काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर आहेत. बेगुसरायमधून भाजप उमेदवार गिरीराज सिंह यांची विजयाकडे वाटचाल सुरू असून, आरजेडीचे तन्वीर हसन व कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर असून, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती तिसर्‍या स्थानावर आहेत. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा असून, भाजप 9 व काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. केरळमधील तिरुवअनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शशी थरूर 13 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर भाजपचे राजशेखरन आहेत. दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले शशी थरुर यंदा विजयाची हॅटट्रिक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker